औरंगाबाद: ‘दुरून डोंगर साजरे’असे म्हणण्याची वेळ औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाबाबतही आली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाची या विमानतळाकडे असलेली डोळेझाक, विमान कंपन्यांची मिजासगिरी आणि विमानतळ प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यास कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे. एका पाठोपाठ एक विमानांची उड्डाणे बंद होत असताना नागरी उड्डयन मंत्रालयाने त्याची कारणे जाणून घेणारा अहवाल संबंधित अधिकार्याकडून तातडीने मागावून घेणे गरजेचे असतानाही त्या मंत्रालयाने औरंगाबादच्या विमानतळाबाबत सवतीचा सुभा असल्याची भूमिका अंगीकारली. प्रशासकीय अधिकार्यांनीही ‘दिन जाओ,पैसा आओ’ अशी कार्यनिती आचरणात आणली. तर दुसरीकडे विमान कंपन्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे सेवा बजावणे सुरु केले.
पुरेशा सुविधा नाहीत. हा समस्यांचा रेटा भांडवल करत विमान कंपन्यांनी औरंगाबाद विमानतळावरून होणारी विमानांची उड्डाणे कमी करून ती विमानसेवा नव्याने सुरु झालेल्या शिर्डी येथील विमानतळावरून पुरविण्यास प्राधान्य दिले. औरंगाबादच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला गेला आहे.
येथून परराष्ट्रांकडे अधिकाधिक विमाने झेपावतील, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे. परराष्ट्रांकडे तर सध्या एकही विमान झेप घेत नसून देशांतर्गत विमानसेवेचाही अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे. साधे मुंबईला जाण्यासाठी सध्या केवळ एकच विमान सुरु आहे. विमानसेवेत झालेली कपात औरंगाबादच्या व्यापार - उद्योगावर बेतते आहे. विमानसेवेच्या अभावाचा फटका उद्योगनगरीला बसतो आहे. येथे विकासाच्या नावाखाली पंचतारांकित औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यात आली. ‘डीएमआयसी’ प्रकल्ही धडाक्याने राबविला जातो आहे.
व्यवसाय -उद्योगाच्या निमित्ताने अनेक मोठमोठे उद्योगपती औरंगाबादच्या प्रवासाशी जोडले गेले आहेत. मराठवाड्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, पदाधिकारी, व्यापारी, मंत्रीगण, विविध क्षेत्रातील मान्यवरांना कामानिमित्त जर साधे मुंबईला तातडीने जायचे असले तरी केवळ विमानसेवा अपुरी आणि तीही पाहिजे त्या वेळेत नसल्याने गरजवंतांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो आहे. औरंगाबाद विमानतळावर जर नजर टाकली तर ते आता एखादे माळरान, क्रिडांगण वा जनावरांना चरण्यासाठी सोडलेले गायरान अशीच अवस्था होण्याच्या मार्गावर आहे. सध्या तरी या विमानतळावर विमानांच्या ऐवजी घारी-गिधाडांच्याच घिरट्या वाढत असल्याचेही दृष्टीस पडत आहे.